

गणरायाच्या कृपेचा, वसा समाजसेवेचा!!!

सर्वाज्ञाननिहन्तारं सर्वज्ञानकरं शुचिम्। सत्यज्ञानमयं सत्यं मयूरेशं नमाम्यहम्॥
अशा मनाला प्रसन्नता देणार्या, ज्ञानाची देवता असलेल्या, सत्यदर्शी सर्वव्यापक सर्वसमावेशक सर्वस्पर्शी श्री गणरायाचरणी वंदन!
‘सुखकर्ता, दुःखहर्ता’ अशा बिरुदावलीने अलंकृत असलेल्या सर्व विद्या-कलांचे अधिष्ठान श्री गणरायाच्या शुभागमनाने सामूहिक लोकजीवनात आनंदाचे चैतन्य उभे राहत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली, आणि उत्सवप्रिय मराठी माणूस त्यात दंगून गेला. आज केवळ महाराष्ट्रात किंवा राष्ट्रातच नाही तर अवघ्या विश्वात हा उत्सव एक सोहळा म्हणून साजरा केला जातो. ‘गणेशोत्सव मंडळ’ ही खरे तर एक कार्यशाळाच, अनेक नावाजलेले, शिखरावर असलेल्या दिग्गज व्यक्तीमत्वांनी त्यांच्या सामाजिक जीवनाची मुहुर्तमेढ कुठल्या न कुठल्या मंडळातुन रोवलेली आढळते.
गणेशोत्सव सोहळ्यातील अग्रणी ‘शिवडी मध्यविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ यंदा यशस्वी रित्या 72 व्या वर्षात पदार्पण करीत आहे, प्रतिवर्ष अधिकाधिक प्रगति साधत. याचे सर्वार्थाने श्रेय जाते मंडळास अविरत सर्व आघाड्यांवर सहकार्य करणारे असंख्य हितचिंतक, देणगीदार, वर्गणीदार, अहोरात्र गणरायासाठी झटणारे तमाम कार्यकर्ते, विभागातील नागरिक आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक श्री. विजय जयराम इंदुलकर यांच्यासह आपणा सर्वांना… तुम्हां सर्वांच्या सहभागाने आपल्या मंडळाची कारकिर्द प्रतिवर्ष बहरत आहे, सर्वांचे मन:पूर्वक आभार.
सवंग प्रसिद्धीच्या मागे न लागता ‘शिवडी मध्यविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले, हे नमुद करताना मनात एक अभिमान जाणवतो. मंडळाने शिक्षण क्षेत्रात शिवडीचा राजा ज्ञान प्रबोधिनी पुस्तकपेढी सारख्या उपक्रमातुन; जेष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी समाजसेवी उपक्रमातुन; महिला सबलीकरणास्तव शिबिरातुन; महिलांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवुन देण्यासाठी कलास्पर्धातुन; क्रीडापटुंचे कौतुक करण्यासाठी, नवोदित, होतकरू खेळाडूंच्या अंगभुत क्रीडागुणांना चालना देण्यासाठी भव्य क्रीडास्पर्धांमधुन; आरोग्य क्षेत्रात रक्तदान शिबीरे / आरोग्य चिकित्सा शिबीरे आयोजित करुन; बालकांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करुन; भजनी मंडळाचे कार्यक्रम आयोजित करुन प्रगल्भतेने सामाजिक बांधिलकी जपली.
मंडळाने देखाव्यांमध्ये देखील भव्यता राखतानाच आधुनिकतेची कास धरत काळानुरुप वैविध्यपूर्ण आणि अर्थपूर्ण सामाजिक संदेश देण्याचे देखील सातत्य राखले. किंबहुना, शिवडीचा राजा येथील देखावा हे अनेकांसाठी एक औत्सुक्याचे आणि आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. म्हणूनच, महाराष्ट्र शासनाच्या ‘गणेशोत्सव मंडळा’च्या गौरवास्पद पारितोषिकाचे मानकरी ठरण्याचे भाग्य मुंबईत केवळ एकाच मंडळास प्राप्त झाले, ते म्हणजे ‘शिवडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’!
आज गणरायाच्या आगमनाने यत्र तत्र सर्वत्र एक भक्तीमय आनंदमय पवित्र वातावरण निर्माण झालंय. या भक्तीरसात आपण सर्वजण श्री गणेशासमोर मन:पूर्वक नतमस्तक होऊन प्रार्थना करुया,
ॐ भद्रङ् कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ।।
अर्थात :- हे गणराया आमच्या कानात असे शब्द पडावे ज्यामुळे आम्हाला ज्ञान मिळावे आणि निंदा व दुराचारापासून दूर राहावे. आम्ही सदैव समाजसेवेत मग्न राहो, वाईट कर्मांपासून सदैव दूर राहो. ‘शिवडीच्या राजा’ चरणी हीच प्रार्थना!!! बाकी आपत्तींचे निराकरणा करण्यासाठी विघ्नहर्ता पाठीशी आहेच!
समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, वर्गणीदार, जाहिरातदार, देणगीदार, हितचिंतक, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आपले योगदान देणारे गणेशभक्त या सर्वांनी मंडळाला आतापर्यंत अनमोल असे सहकार्य केलेले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे असेच सहकार्य व साथ या वर्षीही लाभो, हिच शिवडीच्या राजा चरणी प्रार्थना.
चला तर मग, सालाबादप्रमाणे यंदा देखील मोठ्या दिमाखात, जल्लोषात आणि शिस्तबद्ध रित्या साजरा करुया गणेशोत्सव…
शिवडीच्या राजाचा विजय असो… बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया…!
